उच्च शिक्षण संचालनालयाला सांघिक विजेतेपद
पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६ चा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना .चंद्रकांत दादा पाटील होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय म्हणाले की, “माणसाची मानसिक भूक वेळेत भागवली जाणे अत्यावश्यक आहे. केवळ अर्थार्जन करून चालत नाही; जोपर्यंत मनुष्य सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने प्रगल्भ होत नाही.” कविता लेखनाला प्रोत्साहन देण्याचा मनोदय व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “कल्पना केल्याशिवाय कविता सुचत नाही; त्यामुळे सर्जनशीलतेला वाव देणारे उपक्रम वाढवले पाहिजेत.यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर , मा.चारुशीला गायके,सहसंचालक डॉ.अर्चना बोऱ्हाडे,सर्व सहसंचालक,उपस्थित होते.
कार्यक्रमात क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि अॅथलेटिक्स या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना मंत्री महोदयांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुणे,सोलापूर,मुंबई,पनवेल,नागपूर, नांदे ड,जळगाव,अमरावती,उच्च शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी,अधिकारी, विभागीय सहसंचालक यांनी यामध्ये सहभाग घेतला.
उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि विभागात स्नेहबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल मंत्री महोदयांनी त्यांचे अभिनंदन केले व अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज अधोरेखित केली.
या समारंभामुळे क्रीडा व संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला असून, सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.