यावेळी बोलताना मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण म्हणाले की, उच्च शिक्षण संचालनालय संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले उच्च शिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. या दृष्टीने विविध उपक्रम विभाग सतत राबवित आहे. त्याच अनुषंगाने शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंगशी उपरोक्त करार झाला. या माध्यमातून विभागाच्या १० विभागीय कार्यालया मार्फत त्या त्या विभागातील महाविद्यालयासाठी भव्य मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ शैलेंद्र देवळाणकर व श्री पी एन जुमले यांनी या वेळी सांगितले.
बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभागाचे संचालक श्री पी एन जुमले, यांनी सांगितले की पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच एप्रेटीसशिप प्रशिक्षण मिळायचे. आता मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार भारत सरकार द्वारा सर्व पदवीधर व डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (एनएटीएस) अंतर्गत एप्रेटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान एप्रेटीसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन दिले जाते. विद्यावेतनाचा किमान दर 8 हजार रुपये प्रति महिना इतका आहे. या विद्या वेतनातील 50 टक्के भाग भारत सरकारद्वारा एप्रेटीसना डीबीटी द्वारा सरळ त्यांच्या खात्यात जमा केला जातो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ मिळावा म्हणून हा करार केल्याचे जुमले यावेळी सांगितले.